Mental health: करोनाकाळात वाढतोय मानसिक ताण – increasing mental stress in the coronar period


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना संसर्गाच्या काळामध्ये भारतीयांच्या मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यात महिलांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मानसिक अस्वस्थता येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. ६५ टक्के मानसोपचार तज्ज्ञांनी स्वतःला इजा करणे तसेच आत्महत्या करण्याचा प्रयास करण्याच्या प्रकारांमध्ये करोना संसर्गाच्या काळामध्ये वाढ झाल्याचे सांगितले. नोकरी जाण्याची भीती, तणाव, एकलकोंडेपणा आणि आर्थिक असुरक्षिता हे अशा वर्तनास कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांना आढळत आहे.

करोनाच्या काळात वाढत गेलेले लॉकडाउन, बळजबरीने करण्यात आलेले आयसोलेशन, आर्थिक असुरक्षितता, घरगुती हिंसाचार आणि नोकरीबाबतची वाढणारी चिंता यामुळे मानसिक आरोग्याचे संकटही तितकेच वाढले आहे. कोविड-१९ च्या कालावधीत ‘सुसाइड प्रिव्हेंशन इंडिया फाऊंडेशन’ या बेंगळुरू येथील संस्थेने १५९ मानसोपचार तज्ज्ञांसोबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षानुसार, भारतीय नागरिकांमध्ये आत्महत्या करण्याची भावना, स्वतःच्या शरीराला हानी करून घेणे, मानसिक आजार पुन्हा बळावले आहेत.

नोकरी जाण्याची चिंता, आर्थिक चणचण, आर्थिक असुरक्षितता, कामाचा वाढता ताण, सामाजिक संपर्क न राहणे यासारख्या गोष्टी वाढल्याचे ‘सुसाइड प्रिव्हेंशन इंडिया फाऊंडेशन’चे संशोधन सल्लागार नूर मलिक यांनी सांगितले. सर्व सामाजिक स्तरांमध्ये आणि विविध वयोगटांमध्ये मानसिक आरोग्याशी निगडित समस्या वाढल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व वयोगटांपुढे समस्या

मानसिक आरोग्याचा सल्ला घेणाऱ्या व्यक्तींमध्ये १८ वर्षांच्या व्यक्तींपासून ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक होते. तरुण तसेच काम करणाऱ्या व्यक्तींमध्येही मानसिक तणाव वाढल्याचे दिसून आले. ३५ टक्के व्यक्तींनी आपण स्वतःला इजा करून घेणार होतो, असे सांगतिले. करोनाची साथ केव्हा नियंत्रणात येईल हे माहित नसल्याने मुळातच असलेला ताण अधिक वाढत आहे, यापूर्वी ज्या व्यक्ती मानसिक आजारांतून बऱ्या झाल्या होत्या, त्यांच्यामध्येही पुन्हा लक्षणे दिसत आहेत, याकडे मानसोपचार तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *