doordarshan: दूरदर्शनच्या सर्वोच्च पदी मराठी व्यक्ती का नाही? – why is there no marathi person in the highest position of doordarshan


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये ‘अनिवार्य मराठी’साठी अधिकाधिक प्रयत्न होत असताना मराठी माणसांशी जवळचे नाते सांगणाऱ्या मराठी दूरदर्शन केंद्राच्या सर्वोच्चपदी मराठी व्यक्ती का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गेली सुमारे दहा वर्षे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दूरदर्शनचे मराठी केंद्र चालवण्यासाठी मराठी माणसाची नियुक्ती का करण्यात आली नाही, अशी विचारणा करणारे पत्र माहिती आणि सूचना प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी बुधवारी या संदर्भातील पत्र पाठवले. अतिरिक्त महासंचालक या सर्वोच्च पदासाठी मराठी व्यक्ती का मिळत नाही, अशी विचारणा त्यांनी या पत्रामध्ये केली आहे. त्याचसोबत त्यांनी अतिरिक्त महासंचालकपदी दूरसंचार विभाग किंवा माहिती विभागाशी संबंधित नसलेल्या खात्यातील व्यक्ती आणून का बसवली जाते ,अशीही विचारणा केली आहे. तात्पुरती बदली होऊन या पदाचा कारभार सांभाळणारे अधिकारी या सेवेशी थेट संबंधित नसतात. त्यांना मराठी संस्कृती, भाषा, कार्यक्रम याविषयीची माहिती नसते. त्यामुळे या पदांवर बसण्यासाठी ते पात्र नसतात. तरीही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्यांना संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे हे पद दिले जाते, असा आक्षेप त्यांनी पत्रामध्ये नोंदवला आहे.

सध्या नीरज अग्रवाल मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अतिरिक्त महासंचालकपदी आहेत. त्यांच्या आधी एम. एस. थॉमस, मुकेश शर्मा, लक्ष्मेंद्र चोप्रा यांनी हा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे सन २०११पासून एकाही मराठी माणसाला हा पदभार मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

अमराठी व्यक्तींचेही योगदान

दूरदर्शन आणि आकाशवाणी येथील काही आजी-माजी कर्मचाऱ्यांनी मात्र सर्वोच्च पदी मराठी व्यक्ती नसली तरी प्रत्येक व्यक्तीने आकाशवाणी आणि सह्याद्री वाहिनी मोठे करण्यासाठी योगदान दिल्याची भावना व्यक्त होत आहे. मुकेश शर्मा हे आडनावाने मराठी नसले तरी त्यांची मराठीशी नाळ घट्ट जोडलेली होती. त्यांच्या काळात अनेक मराठी कार्यक्रम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. सध्याचे अतिरिक्त महासंचालकही यू-ट्यूबवर आकाशवाणीचा खजिना घेऊन मराठी भाषेतील गोडी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. मराठी माणसेही इतर राज्यांमध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार सांभाळत होती. अमराठी व्यक्ती मराठी सहकाऱ्यांना विचारून त्यानुसार नियोजन करते. त्यामुळे यामध्ये मराठीचे नुकसान होत नाही, अशी प्रतिक्रियाही देण्यात आली. सर्वोच्चपदी अमराठी व्यक्ती असतानाही दूरदर्शनवर एखाद्या साहित्यिकाला श्रद्धांजलीपर लाइव्ह कार्यक्रम करण्याचे निर्मात्याने सुचवले तर तसे अमलात आणले जात होते. त्यामुळे साहित्यिक, कलाकार यांची सगळी माहिती सर्वोच्च पदावरील व्यक्तीला नसतानाही मराठी संस्कृतीवर अन्याय मात्र होऊ दिला जात नव्हता, असे आश्वस्त करण्यात आले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *