delhi to london bus: तब्बल १८ देशातून प्रवास; थेट दिल्ली ते लंडन बस धावणार – delhi to london bus via china and central asia


नवी दिल्ली : होय, तुम्हाला विश्वास बसला नसेल. पण रस्ते प्रवासाची आवड असेल तर आयुष्यातली सर्वात मोठी संधी २०२१ मध्ये चालून आली आहे. अॅडव्हेंचर ओव्हरलँड या पर्यटन कंपनीने जगातील सर्वात मोठी रोड ट्रीप जाहीर केली असून हा प्रवास २०२१ पासून सुरू होणार आहे. भारताची राजधानी दिल्लीतून निघणारी ही बस अनेक देशांचा प्रवास करत ब्रिटनची राजधानी लंडनला पोहोचणार आहे.

७० दिवसात १८ देशांचा प्रवास होणार

या पर्यटन कंपनीने आपल्या पोस्टमध्ये या अँडव्हेंचर ट्रीपची माहिती दिली आहे. प्रवाशांना ७० दिवसात १८ देशांमधून २० हजार किमीचा प्रवास करावा लागणार आहे. एका आलिशान आणि आरामदायी बसमधून प्रवाशांची सोय करण्यात येईल. या बसमधील प्रवाशांना म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, कझाखस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, रशिया, लिथुआनिया, लॅटविया, पोलंड, शेज रिपब्लिक, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये वेळ घालवता येईल.


चार टप्प्यात प्रवास

हा लांबलचक प्रवास चार टप्प्यात विभागलेला असेल. पहिल्या टप्प्यात भारत, म्यानमार, थायलंड, दुसऱ्या टप्प्यात चीनमधील सिशुआन आणि शिजियांग यांचा समावेश असेल, जिथे ग्रेट वॉल ऑफ चायना, सिल्क रुट आणि गोबी डेजर्टसह इतर लोकप्रिय ठिकाणे पाहायला मिळतील. यानंतर मोर्चा मध्य आशियाकडे वळवला जाईल, जिथे किरगीस्तान, उझबेकिस्तान, कझाखस्तान आणि रशियाची सफर होईल. अंतिम टप्प्यात लॅटविया, पोलंड, लिथुआनिया, शेझ रिपब्लिक, नेदरलँड्स, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स आणि ब्रिटन या युरोपियन देशांचा प्रवास करावा लागेल.

कशी असेल बुकिंग?

या बससाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. पण या कंपनीकडून २० पेक्षा जास्त प्रवाशांना नेलं जाणार नाही. जे प्रवासी पूर्ण प्रवासासाठी पैसे देतील त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल.

इतर माहिती

प्रवासाचं माध्यम – विशेष सुविधांसह आलिशान आरामदायी बस
ट्रीपचा खर्च – १५ लाख रुपये प्रति व्यक्ती
कालावधी – पहिला टप्पा (११ रात्री, १२ दिवस), दुसरा टप्पा (१५ रात्री, १६ दिवस), तिसरा टप्पा (२१ रात्री, २२ दिवस), चौथा टप्पा (१५ रात्री, १६ दिवस)
शाकाहारी अन्न – स्थानिक पदार्थ
समावेश – शेअरिंग तत्वावर हॉटेल, व्हिसा आणि स्टँडर्ड टुरिस्ट व्हिसा फी, बॉर्डर क्रॉसिंग मदत, अनुभवी मार्गदर्शक
दरम्यान, या प्रवासात आंतरराष्ट्री किंवा देशांतर्गत विमान तिकीट, तत्काळ टुरिस्ट व्हिसा, वैद्यकीय खर्च यांचा समावेश नसेल.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *