Aurangabad Development Authority: मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा – cm uddhav thackeray announces development authority for aurangabad


औरंगाबाद: मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्याने मराठवाड्यातील जनतेला ऑनलाईन पध्दतीने शुभेच्छा देताना ते बोलत होते. मराठवाडा करोनामुक्त करण्याची शपथ घ्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा सिध्दार्थ उद्यानात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुक्तिसंग्राम दिना निमित्त मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ‘मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची देखील भूमी आहे. अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवणे हे मराठवाड्याचे वैशिष्ट्य आहे. मुक्तिसंग्रामसाठी अबालवृध्दांनी योगदान दिले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक जण या मुक्ती लढ्यात सहभागी झाले. त्या सर्वांना मी वंदन करतो, असा उल्लेख त्यांनी केला. मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्यांचा वारसा सांगणारी आजची पिढी आहे. आपले मराठवाड्याशी, औरंगाबादशी वेगळे नाते आहे, भावनात्मक नात्याची आपली जवळीक आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून केला. हैदराबाद मुक्तिसंग्रामचा लढा विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ द्यायचा नाही, मुक्ती लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा आहे आणि त्यासाठी सिध्दार्थ उद्यानाच्या परिसरात मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडा चिवट आणि जिद्दी आहे असे सांगताना ते म्हणाले, विकासाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल सुरू आहे, पण त्यात काही अडचणी आहेत. मराठवाडा भविष्यात दुष्काळग्रस्त होऊ नये याची खबरदारी, जबाबदारी आम्ही घेतलीआहे. समृध्दी महामार्ग झाल्यावर मराठवाडा समृध्द होईल असा उल्लेख करून ते म्हणाले, मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल. या प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी सूचना त्यांनी केली.

वाचा: ‘या’ गर्दीमुळे करोना होत नाही का; व्हिडिओ शेअर करून मनसेचा सवाल

‘ज्याप्रमाणे त्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेला मराठवाड्यातील अबालवृद्ध एकवटून त्यांनी रझाकारी अत्याचार मोडून टाकला, तसंच आपलं करोना विषाणू बरोबरच दुसरं युद्ध आहे, त्याच्याबरोबर आपल्याला लढायचं आहे. सर्वांनी या लढाईत उतरा. मराठवाडा करोनामुक्त करण्याची शपथ घ्या,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

वाचा: केंद्र सरकारचे वादे आणि दावे खूप, पण देश मागे हेच वास्तव; सेनेची टीका

यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. देसाई यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले, त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय , पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील आदींची विशेष उपस्थिती होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *