Venus mission: भारत घेणार आणखी मोठी झेप! २०२३ मध्ये ‘शुक्र’वारी – life on venus? india set for new space mission


मुंबई : चंद्र, मंगळ यानंतर आता साऱ्या जगाचे लक्ष पृथ्वीपासून तुलनेने जवळ असलेल्या शुक्र ग्रहावर लागले आहे. यात भारतही मागे नाही. भारतानेही शुक्र ग्रहावर अंतराळयान उतरवण्याची योजना आखली आहे. यात काही उपकरणांची निर्मितीही केली आहे. आता यावर सरकारी पातळीवर शिक्कामोर्तब झाले की, भारतीय अंतराळ संस्था शुक्र ग्रहावर वारी करण्याची अंतिम तयारी सुरू करणार आहे.

कार्डिफ विद्यापीठातील प्रा. जेन ग्रीव्हज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानंतर शुक्र ग्रहाभोवतीच्या ढगांमध्ये दुर्मिळ फॉस्फाइन रेणू आढळल्यामुळे शुक्राच्या वातावरणामध्ये सजीव सृष्टी असेल का? याबद्दल चर्चा सुरू झाली. जगभरातील अंतराळ संस्था शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ आणि ‘इस्रो‘ या संस्था आघाडीवर आहेत. ‘नासा’ने सध्या या मोहिमेचा निधी कमी केला आहे. यामुळे ‘इस्रो’ला शुक्र ग्रहावर प्रथम जाण्याची संधी मिळू शकणार आहे. यासाठी भारताने पूर्ण तयारी केली आहे. तसेच तेथील वस्तुमान अभ्यासण्यासाठी उपकरणही तयार करण्यात आल्याचे या प्रकल्पात काम करणारे त्रिवेंद्रम येथील ‘भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ संस्थचे शास्त्रज्ञ उमेश कढाणे यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण तयार असून त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर २०२३मध्ये तो पूर्णत्वास नेण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.

संशोधनाचे निष्कर्ष

प्रा. ग्रीव्हज यांनी सादर केलेल्या प्रबंधातील निष्कर्ष हे शास्त्रज्ञांना अनपेक्षित होते यामुळे त्याची चर्चा झाली. आता वातावरणात जे रेणू दिसले ते आणखी कशातून निर्माण होऊ शकतात का? यावर आधी संशोधन होईल, असे प्रा. कढाणे यांनी सांगितले. आजपर्यंतच्या माहितीनुसार हे रेणू निसर्गातील हालचालींतून बाहेर येतात. म्हणजे वीज चमकल्यावरही हे रेणू दिसतात. आताच्या संशोधनात हा रेणू ग्रहावरील ढगात आढळला आहे. मात्र ग्रहाच्या पृष्ठभागावर त्याचे अस्तित्व दिसले नाही.

काय आहे आव्हान?

शुक्र ग्रहाची अभ्यास मोहीम या ग्रहाच्या विविध थरांचा, वातावरणाचा आणि सूर्याशी येणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणार आहे. मात्र शुक्र ग्रह हा सूर्यापासून जवळ आहे. यामुळे तेथे अंतराळयान उतरविणे हे एक आव्हानात्मक काम असणार आहे, असेही कढाणे यांनी सांगितले.

तीन भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग

शुक्र ग्रहावर जीवन आहे असा अनुमान भारतीय वंशाचे डॉ. संजय लिमये, डॉ. पराग वैशंपायन, डॉ. राकेश मोगुल या तिघांनी २०१८ मध्येच त्यांच्या प्रबंधात बांधले होते. या आणि इतर प्रबंधांचा आधार घेत प्रा. ग्रीव्हज यांनी केलेल्या संशोधनाचे हे फलित आहे. डॉ. लिमये हे अंतराळातील वातावरणाचे गाढे अभ्यासक मानले जातात. यात शुक्र ग्रहाच्या वातावरणावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. यामुळे त्यांना खगोल क्षेत्रात ‘व्हीनस मॅन’ म्हणूनही ओळखले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *