coronavirus in mumbai: फैलावास सोसायटी पदाधिकारी जबाबदार कसे? – mumbai citizen asked to bmc how is the corona spread office bearer responsible


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, तशी याची जबाबदारी नागरिक आणि सोसायट्यांवर ढकलण्याकडे कल दिसून येत आहे. करोना रुग्ण आढळल्यास महापालिकेकडून बजावण्यात येणाऱ्या नोटीशींमध्ये संबंधित सोसायट्या योग्य ती काळजी घेत नाहीत, असा सूर लावून त्या सोसायट्यांमधील पदाधिकारी यासाठी जबाबदार असल्याचे नमूद करण्यात येत आहे. या नोटीशींबद्दल कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेकडून उपाययोजनांसंदर्भात सोसायट्यांना देण्यात आलेल्या माहितीचाही या नोटीशीमध्ये समावेश आहे. मात्र त्याचसोबत, सुचवलेल्या उपाययोजना न केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव संबंधित सोसायटीमध्ये वाढल्याचा सूर या नोटिशीत लावण्यात आला आहे. एवढेच नाही, तर संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कार्यवाही करावी, असेही या नोटीशीमध्ये नमूद आहे. यावरून अनेक सोसायट्यांमधील समिती सदस्य नाराजी व्यक्त करत आहेत. करोना हा साथीचा आजार आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लोक नोकरीसाठीही जायला लागले आहेत. अशा वेळी एखादी व्यक्ती करोनाग्रस्त झाल्यास त्यासाठी इमारतीतील समिती सदस्य जबाबदार कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सोसाट्यांमध्ये काळजी घेतली जाते की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी ठरावीक कालावधीने सोसायट्यांमध्ये येऊन पाहणी करत नाहीत. अशा वेळी सोसायट्यांमध्ये उपापयोजना केली जात नाही, हे कोणत्या आधारे म्हटले जाते, असा सवालही सोसायट्यांनी केला आहे. पालिकेच्या अशा भाषेमुळे सोसायटीच्या समिती सदस्यांनी राजीनामा दिला, तर सोसायटीचे काम कसे चालवायचे, असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र कंगना रनौट प्रकरण, व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी मारहाण या पार्श्वभूमीवर या विरोधात आवाज उठवण्याची भीतीही वाटत असल्याची भावना काहींनी व्यक्त केली.

वादाची शक्यता

या आधी ज्या सोसायट्यांमध्ये करोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यातील काही समिती सदस्यांनी मे, जूनमध्ये दिलेल्या नोटीशीमध्ये अशा प्रकारे भाषा वापरली नव्हती, असे स्पष्ट केले. त्यावेळी ज्या व्यक्तींपासून करोना संसर्ग होऊ शकतो, अशा व्यक्तींनी घरात विलगीकरण करून घेणे, त्यांनी इतरांच्या संपर्कात न येणे ही सोसायटीची जबाबदारी असल्याचे नमूद केले होते. सातत्याने काळजी घेणे गरजेचे असले, तरी अशा पद्धतीने दोषी ठरवण्याने सोसायट्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या काळात लोकांनी एकमेकांना मदत करण्याची अपेक्षा असताना एकमेकांबद्दल नाराजी निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नोटीसची भाषा बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *