Maharashtra Navnirman Sena: मनसे नेमके काय करतेय! – maharashtra navnirman sena share video with what exactly is mns doing tagline


‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, तसेच अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गोंधळ सुरू असताना, अशावेळी मनसे नेमके काय कामे करतेय हे सांगणारा व्हिडीओ मनसेकडून प्रसारित करण्यात आला आहे. केवळ राजकारण करण्यापेक्षा जनतेला अपेक्षित कामे करण्यावर मनसेचा कसा भर आहे, हे या व्हिडीओमधून दाखविण्यात आले आहे.

‘अभिमानाने सांगा मनसे नेमके काय करतेय,’ अशी टॅग लाइन घेऊन मनसेने हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. साडेपाच मिनिटांच्या व्हिडीओत लॉकडाउनमध्ये मनसेने नेमके काय काम केले त्याचा लेखाजोखा मांडला आहे. मनसेच्या त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामाची थोडक्यात माहिती दिली आहे.

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी कोविडकाळात लाखोंची बिले वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांना दणका देत ही बिले कमी केल्याचे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. रुग्णांना तातडीने बेड्स उपलब्ध करून दिल्याचेही म्हटले आहे. मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी लॉकडाउनमध्ये मनसेने अन्नपुरवठा आणि पीपीई किट दिल्याचे सांगितले आहे, तर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मनसेने मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांना सुरक्षा कवच आणि ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवून दिल्याचे सांगितले आहे. मनसेच्या सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि मोफत खते वाटल्याचा उल्लेख आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत बसेस उपलब्ध करून दिल्याचे, तर मनसे या संकटाच्या काळात चित्रपट आणि नाट्यसृष्टीमागे ठाम उभी राहिल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी मनसेने लहान मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय केले ते निदर्शनास आणून दिले आहे. तर माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच इतरांनाही लोकलमध्ये प्रवास करण्यास मुभा मिळावी म्हणून प्रयत्न केल्याचे दाखविण्यात आले आहे.

याशिवाय बाळा नांदगावकर यांनीही बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, गोरगरिबांना अन्नधान्य देणे, पुण्यात ११ अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, नगरमध्ये भाजीपाला आणि बियाणांचा पुरवठा, बेस्ट कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप आदी कामांची जंत्रीच सादर केली आहे. वीजदरवाढीच्या विरोधात आंदोलन, वाहतूकदारांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका आणि मंदिरप्रवेश मिळावा म्हणून घेतलेली भूमिका आदी कामांचा उल्लेखही या व्हिडीओमध्ये आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *