KEM Hospital: जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याचा आरोप करत केईएममध्ये डॉक्टरांना शिवीगाळ – relatives threaten and abuse kem doctor after patient dies


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना काळामध्ये संसर्गाची पर्वा न करता अहोरात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना नातेवाईकांच्या रोषाला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी महिला निवासी डॉक्टरला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. रुग्णाला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा आरोप करत, नातेवाईकांनी अतिदक्षता विभागामध्ये गर्दी करून तिथे उपस्थित महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ केली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रुग्णालयाने या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक झाली नव्हती.

रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या १८ वर्षीय तरुणाला ताप येत असल्याने तीन दिवस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्रकृती बिघडल्यानंतर त्याला ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता केईएममध्ये आणण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल करतानाच त्याचा रुग्णाला फिट आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची सर्व माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी देण्यात येत होती. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना ईसीजीचे वैद्यकीय अहवाल दाखवून निधन झाल्याचे सांगण्यात आले. मात्र १५ ते २० मिनिटांत आयसीयूमध्ये मोठ्या संख्येत नातेवाईक आले आणि न सांगता जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याचा दावा त्यांनी केला. ईसीजी अहवाल फाडून तिथे उपस्थित महिला निवासी डॉक्टरला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

रुग्ण अजूनही जिवंत असल्याचा दावा करून त्यांनी व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव टाकला. व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर त्यावर आलेख दिसून लागल्यावर नातेवाईकांनी पुन्हा शिवीगाळ केली.

तो आलेख कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शवणारा

डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे तसेच व्हेंटिलेटरवरील आलेखाची रेषा सपाट नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतो. मात्र हे यंत्र ‘ईसीजी मशिन’ नसून कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘व्हेंटिलेटर मशिन’आहे. त्यामुळे त्यावर दिसणाऱ्या आलेखीय रेषा या मशिनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या आहेत, त्या हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाची संबंधित नाहीत नाहीत, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. अशा गैरवर्तनामुळे करोना काळामध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो, अशी खंत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ आणि रुग्णालयाची बदनामी करणे याबाबत पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

… तर काम बंद

निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसंदर्भात केवळ आश्वासने दिली जातात. यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड‘ संघटनेने दिला आहे. केईएमच्या आवारात निवासी डॉक्टरांनी या प्रकाराच्या निषेधार्थ निदर्शने करून सुरक्षेची मागणी केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *