health department of pune: पुणे महापालिका ‘सेनापती’ विनाच लढतेय करोनाशी युद्ध – health department of pune municipal corporation has not permanently main officer


म. टा. प्रतिनिधी, पुणे

तब्बल चाळीस लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी आणि सात हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणारी पुणे महापालिका सध्या कायमस्वरूपी आरोग्यप्रमुखांविनाच करोना संकटाचा सामना करत आहे. शिवाजीनगरचे जम्बो रुग्णालय आणि बाणेरचे कोव्हिड केंद्र या दोन्हीही ठिकाणी लक्ष देण्यासाठी पालिकेचा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ‘सेनापती’विना हतबल झाली आहे.

पुण्याला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख नसल्याची ओरड दोन वर्षांपूर्वी विधिमंडळात झाल्यानंतर राज्य सरकारने डॉ. रामचंद्र हंकारे यांची नियुक्ती केली. त्यांनी चार-पाच महिने डॉ. नितीन बिलोलीकर यांच्या मदतीने करोनाशी दोन हात केले. दोघेही सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. डॉ. हंकारे पुढील दहा दिवस रजेवर असून, त्यांचा पदभार तूर्त डॉ. अंजली साबणे यांच्याकडे आहे. संकटकाळातही त्या फोन उचलत नसल्याने त्यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच महिने नेटाने लढणारे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे हेदेखील आजारपणामुळे रजेवर आहेत. डॉ. वैशाली जाधव, डॉ. कल्पना बळीवंत आणि डॉ. मनीषा नाईक हे अन्य सहायक प्रमुख कार्यरत असले तरी त्यातील काहींना संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेचा आरोग्य विभाग निर्नायकी झाल्याने पुणेकरांच्या उपचारांमध्ये हेळसांड होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा नव्याने निर्माण झाल्या तरी, मनुष्यबळाअभावी त्या पडून आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने सर्वसामान्य, गोरगरीब करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे.

अजित पवार पुण्यातच तळ ठोका’

शहराचे खालावलेले आरोग्य सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवड्यातील चार दिवस पुण्यातच तळ ठोकून बसावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच होत आहे. ‘शहरातील १६४ नगरसेवक आणि महापालिका, जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून पुणेकरांच्या सहकार्याने हे संकट परतवणे फारसे अवघड नाही. केवळ एक दिवसांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना तंबी देऊन ही समस्या सुटणारी नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यच बोलत आहेत.

परजिल्ह्यांतील रुग्ण ४० टक्के

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर जिल्ह्यांतील काही रुग्ण पुण्यात उपचारांसाठी येत आहेत. सध्या पुण्यात ४० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. या धावपळीत वेळेत खाटा व उपचार उपलब्ध न झाल्याने काहींचा जीवही गेला आहे. या रुग्णांना त्यांच्याच जिल्ह्यात योग्य उपचार मिळाल्यास मृत्यूंची संख्या कमी होईल. राज्य सरकारने त्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *