शफी नायकवडी: ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन – veteran actor shafi nayakwadi passes away


म. टा. प्रतिनिधी, सांगली

सांगलीतील ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी (ता. १३) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. त्यांच्या निधनाने नाट्यपंढरी सांगलीतील एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना कलाकारांमधून व्यक्त होत आहे.

सांगलीतील शफी नायकवडी हे महाविद्यालयीन जीवनापासूनच रंगभूमीशी एकरूप झाले होते. विविध एकांकिका आणि नाटकांमधून त्यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला. सांगलीतील अनेक नाट्य संस्थांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभियानाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. सांगलीत नाट्य चळवळ रुजवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोलाचे कार्य केले. परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या शाखेच्या माध्यमातून अनेक वर्षे बालनाट्य, नाट्य शिबिर, सुगम संगीत, भावगीत यासह अनेक स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले.

नाट्य, प्रशिक्षण शिबिर, चर्चासत्रे या माध्यमातून सांगली आणि परिसरातील नागरिकांमध्ये नाट्य विषयक जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. जानेवारी २०१२ मध्ये सांगलीतील नेमिनाथनगर येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याचे ते कार्यवाह होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे संमेलनाचे आयोजन यशस्वी ठरले. त्यांच्या निधनाने रंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारा सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना रंगकर्मींनी व्यक्त केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *