Kolhapur News : Suicide: सासरचे छळायचे; २ वर्षांच्या मुलाला पोटाला बांधून गर्भवतीची आत्महत्या – pregnant woman with a two year old child committed suicide


सांगली:जत तालुक्यातील रेवनाळ येथील विवाहित गर्भवतीने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री घडली. सोनाली प्रकाश गणाचारी (वय २२) आणि मुलगा प्रज्ज्वल अशी मृत माय-लेकराची नावे आहेत. याप्रकरणी पती प्रकाश गणाचारी, सासरे आप्पासो गणाचारी, सासू सखूबाई गणाचारी, दीर तानाजी गणाचारी, अशोक गणाचारी, जाऊ सारिका गणाचारी (सर्व रा. रेवनाळ, ता. जत) यांच्यावर हुंडाबळी, शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ( Sangli Pregnant Woman Suicide Case Updates )

जत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली व प्रकाश यांचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना प्रज्ज्वल हा दोन वर्षांचा मुलगा होता, तर सध्या सोनाली गर्भवती होती. लग्नात हुंडा दिला असतानाही पती प्रकाश पत्नीच्या माहेरातून कामधंद्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत होता. यावरून वारंवार या दाम्पत्यामध्ये वाद घडत होता. सोनालीला उपाशी ठेऊन मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून सोनालीने आपल्या चिमुकल्याला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सोनाली व मुलगा प्रज्ज्वल दोघेही घरात दिसत नसल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. यावेळी नातेवाईकांना परिसरातील विहिरीत पाण्यावर सोनालीचे चप्पल तरंगत असल्याचे दिसले. यानंतर नातेवाईकांनी पोलिसात वर्दी देऊन सोनालीने विहिरीत उडी मारल्याची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील नागरिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनावेळी जतचे उपविभागीय उपअधीक्षक संदीपसिह गिल यांनी भेट दिली. जोपर्यंत सोनालीचा नवरा, सासू, दीर, सासरा व जाऊ यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका सोनालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी घतली. अखेर गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दत्तात्रय तुकाराम खरात यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास जतचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव करीत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *