suicide: नोकरीवरून काढल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठांवर केले आरोप – employee suicide due to dismissal by company


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विमानतळावर ट्रॉली सुपरवायझर असलेल्या एका कर्मचाऱ्याने नोकरीवरून काढून टाकल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना साकीनाका परिसरातून उघडकीस आली आहे. विनायक खंदारे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. यावरून साकीनाका पोलिसांनी या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत विमानतळावर ट्रॉली सुपरवायझर असलेल्या विनायक खंदारे यांनी १ सप्टेंबर रोजी साकीनाका येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा दरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठीमध्ये खंदारे यांनी तीन अधिकाऱ्यांची नावे लिहिली असून त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी या तीन अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खंदारे हे नोकरीत कायम होते मात्र त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पडले जात होते. वारंवार विनंती करूनही त्यांना कामावर रुजू होऊ दिले जात नव्हते. नोकरी नसल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने तक्रारीमध्ये केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *