Bhagat Singh Koshyari Not Happy With BMC Action Against Kangana – कंगना-शिवसेना वादात राज्यपालांची एन्ट्री; केंद्राला अहवाल पाठवणार?


मुंबई: मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना राणावत यांच्यात सुरू झालेल्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. शिवसेनेनं कंगनाला आपल्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला दिला होता. या टीकेला उत्तर देत तिनं शिवसेनेलाच आव्हान दिलं होतं. त्यामुळं हा वाद चिघळला आणि मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेत शिवसेना सत्तेत असल्यामुळं साहजिकच शिवसेनेच्या इशाऱ्यानंच ही कारवाई झाल्याचा आरोप झाला. या कारवाईवरून अनेकांनी शिवसेनेवर व पर्यायानं राज्य सरकारवर टीका केली होती. आतापर्यंत कंगनाच्या विरोधात बोलणाऱ्या काही मंडळींनी शिवसेनेच्या या कारवाईला विरोध दर्शवला.

राज्यातील अनेक घडामोडींमध्ये बारकाईनं लक्ष घालणाऱ्या राज्यपालांनीही आता या वादात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *